नवी दिल्ली : मोबाइल क्रमांक 1 जुलैपासून 13 अंकी होणार असे वृत्त येऊन धडकल्याने मोबाईलधारक चिंतेत पडले होते. परंतु, चिंता करायचे कारण नसून, मोबाइल क्रमांक 10 अंकीच राहणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी कंपन्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात एम टू एम (मशीन टू मशीन) मोबाइल क्रमांक 10 वरून 13 अंकी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आपल्याही मोबाइलचा क्रमांक बदलेल, असा समज सर्वसामान्य ग्राहकांमध्ये पसरला होता. मात्र, हा समज भारती एअरटेल आणि जिओच्या अधिकार्यांनी दूर केला आहे. सामान्य मोबाइल क्रमांक आणि एम टू एम क्रमांकामध्ये फरक आहे. एम टू एम मोबाइल क्रमांक हे स्वाइप मशीन, वीज मीटर यांसारख्या उपकरणांमध्ये वापरले जातात. त्यामुळे होणारा बदल सर्वसामान्य मोबाइल क्रमांकासाठी नसेल. काही दिवसांपूर्वीच दूरसंचार मंत्रालयाने आदेश जारी केला होता.