मोबाइल टॉवर नागरीवस्तीपासून हटवा

0

ओतूर गावठाणातील ग्रामस्थांची मागणी : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जुन्नर : ओतूर गावठाण हद्दीतील डुंबरे पाटील आळी, होळी चौक, पानसरे आळीच्या मध्यवर्ती ठिकाणी होणार्‍या एका मोबाइल टॉवरचे काम येथील स्थानिक नागरिकांनी बंद पाडले आहे. हा टॉवर इतरत्र हटविण्यासाठी येथील 79 कुटुंबांनी ओतूर ग्रामपंचायत, ओतूर पोलीस स्टेशन, तहसीलदार जुन्नर, प्रांत अधिकारी जुन्नर-आंबेगाव, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत आणि स्थानिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सबंधित मोबाइल टॉवर कंपनीकडेही पाठविण्यात आले आहे.

ओतूर गावठाण हद्दीतील डुंबरे पाटील आळी, होळी चौक, पानसरे आळीच्या मध्यवर्ती ठिकाणी होणार्‍या मोबाइल टॉवरमुळे येथील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह सर्वांनाच इलेक्ट्रोमेग्नेटिक रेडिएशन किरणोत्सर्गामुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच ज्या ठिकाणी टॉवरचे काम सुरू केले होते त्या ठिकाणच्या आणि आजुबाजूच्या रहिवाशांना याबाबत सबंधित कंपनीने टॉवरबाबत कोणतीही कल्पना दिली नाही. प्रस्थापित टॉवरच्या जागेपासून काही अंतरावरच लहान मुलांच्या शाळा, दवाखाने असून याचा त्रास या मुलांना व रुग्णांनाही होणार आहे. त्यामुळे हा मोबाइल टॉवर कंपनीने नागरी वस्तीपासून दूर इतरत्र हलवावा, अशी मागणी नागरिकांनी केलेल्या तक्रार निवेदन अर्जात केली आहे.

किरणोत्सर्गाचा त्रास

केंद्र सरकारने 2006 मध्ये यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, नियम व बंधने ठरविली आहेत. यात या कंपन्यांनी सरकारकडून मोबाइल टॉवर बसविण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक केले आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा 1996 नुसार काही मार्गदर्शक तत्त्व पाळणे आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था व इस्पितळांच्या परिसरात मोबाइलचे टॉवर बसवू नयेत. कारण त्यामुळे मुलांना व आजारी व्यक्तींना प्रतिकार शक्तीअभावी किरणोत्सर्गाचा त्रास संभवतो. गल्ल्यांमध्ये मोबाइल टॉवर्स बसवू नयेत, असेही नियम आहेत. कारण वादळ वा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत ते अधिक धोक्याचे ठरू शकतात. ओतूर गावठाणातील मोबाइल टॉवर तात्काळ लोकवस्ती पासून दूर इतरत्र ठिकाणी हलवावा, अशी मागणी तक्रारी निवेदनात केली आहे.