ठाणे: ठाण्यातील बाळकूम परिसरात मोबाइलच्या दुकानात चोरी करणार्या चौघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात त्यांनी वापरलेल्या रिक्षांच्या क्रमांकावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी कमी वयाचा असल्यामुळे त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर इतर तिघांना मंगळवारपयर्र्त पोलीस कोठडी सुनावली आहे.
कापूरबावडी पोलिसांची कारवाई
नवी मुंबई येथे राहणारे चंदन गुप्ता यांचे ठाण्यातील बाळकूम परिसरात मोबाइल विक्रीचे दुकान आहे. या दुकानात 18 जुलै रोजी काही अज्ञात इसमांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील मोबाइल आणि मोबाइल चार्जर चोरी केले होते. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून इकबाल शेख या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्यानंतर इक्बालचे साथीदार मोहम्मद कुरेशी, सौरभ ठाकूर आणि शुभम खैरनार यालादेखील कापूरबावडी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
विशेष म्हणजे शुभम खैरनार हा कमी वयाचा असल्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या 4 मोटारसायकल आणि एक रिक्षा हस्तगत केली आहे. त्यांच्याकडून दुकानातून चोरी केलेला 57 हजार किंमतीचा मोबाइल, मोबाइल चार्जर, कार टेप आणि युएसबी केबल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर 50 हजार रुपयाची रिक्षा देखील जप्त करण्यात आली आहे.