धुळे । अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या पथकाने मोबाईलचा आयएमईआय नंबर बदलुन देणार्या टोळीचा पर्दाफाश केला असून संशयित पाच व्यक्तिंविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 17 जुलै रोजी धुळ्यातील संशयित दुकानांची झडती घेतली. त्यामध्ये मोबाईल आयएमईआय क्रमांक बदलण्याची उपकरणे व संगणकाची तपासणी करता त्यात आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी लागणार्या फाईल्स व बॅकअप फाईल तसेच मोबाईल कार्यप्रणालीत छेडछाड करण्याकरीता लागणारी फाईल्सची आयकॉन दिसून आली असून ज्यांचा आयएमईआय क्रमांक बदललेला आहे असे 2 मोबाईल मिळालेले आहेत.
4 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त
धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्समधील एस.कुमार मोबाईल या दुकानामध्ये रवि सुरेश मोटवाणी,सहारा मोबाईल या दुकानात जितेंद्र गुलाबराव पाटील, शारदा स्पिकर या दुकानात पुनित मन्वरलाल मेघाणी, बारापत्थर जवळ सेल्युलर मोबाईल या दुकानामध्ये मोईन अख्तर मोहम्मद मुजम्मील अन्सारी व अकबर चौकातील सदफ या दुकानामध्ये मोहमंत सादीक अख्तर हुसेन अन्सारी सर्व रा.धुळे हे विनापरवाना अवैधरित्या स्वतःच्या फायद्यासाठी मोबाईल फोनचे आयएमईआय क्रमांक बदलण्याचे साहित्य व आयएमईआय क्रमांक बदल करण्याच्या उद्देशाने बाळगलेले बंद स्थितीतील मोबाईल असे एकूण 4 लाख 92 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल बाळगतांना आढळून आल्याने या इसमांविरुध्द भादंवि कलम 411,483,485 सह माहिती तंत्रज्ञान आदींसह 2000 चे कलम 66 (सी)(डी) तसेच कॉपीराईट अॅक्ट कलम 63 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून धुळे शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अनिल वडनेरे, सपोनि अशोक तोरडमल, दिगंबर पाटील, पोसई आटोरे, आखाडे, आर.जे.माळी, असई बैरागी, पोहेकॉ मिलींद सोनवणे,पोकॉ लद्दे, चंद्रात्रे, सायबर शाखेतील पोसई निलेश शेंबडे, सायबर सेलचे पोहेकॉ संजय पाटील, पोकॉ राजेश सैंदाणे व दहशतवाद विरोधी पथकाचे पोहेकॉ माळी व शेख यांनी केली.