नवी दिल्ली । मोबाईलच्या सूक्ष्म किरणांमुळे थेट ब्रेन ट्युमरचा आजार होतो, असा धक्कादायक निष्कर्ष एम्स या सरकारी रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे.
1966 ते 2016 पर्यंत जगभरातून करण्यात आलेल्या 22 सर्वेक्षणांचा याकरता अभ्यास करण्यात आला. 48 हजार 452 जणांचे परिक्षण करण्यात आले. अन्य खाजगी कंपन्यांनीही सर्वेक्षणे केली आहेत, मात्र त्यांनी प्रमाणिक विचार केलेला नाही, असे डॉ. कामेश्वर प्रसाद म्हणाले. डॉ. प्रसाद हे या सर्वेक्षणाचे प्रमुख आहेत. 10 वर्षे मोबाईलचा वापर करण्यात आला तर ट्युमर होण्याची शक्यता निर्माण होते, आम्ही तंत्रज्ञानाच्या विकासाच्या विरोधात नाही, मात्र लोकांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा, असेही डॉ. प्रसाद यांनी म्हटले आहे. 2011 मध्ये एका मंत्रीगटाच्या समितीने मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्समधून प्रदर्शित होणार्या सूक्ष्म लहरींमुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते, म्हणून मोबाईल कंपन्यांचे टॉवर रहिवाशी विभाग, शाळा, रुग्णालये इत्यादी ठिकाणी उभारण्यात येऊ नयेत, असे नमुद केले होते. परंतु मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या वापराने होणारे दुष्परिणाम अमान्य केले आहेत.
मोबाईलच्या वापराचे हे दुष्परिणाम आहेत!
ज्या ठिकाणी मोबाईलला कमी रेंज मिळते, तेथे अधिक रेडिएन (सूक्ष्म किरणे) प्रदर्शित होतात. त्यावेळी कानाजवळील मज्जातंतूवर परिणाम होतो. ही सूक्ष्म किरणे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, असे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने म्हटले आहे. या किरणांमुळे ब्रेन ट्युमर तसेच अन्य शारीरिक व्याधीही होऊ शकतात. 2015 पर्यंत जगभरात 4.7 अब्ज मोबाईलचे ग्राहक होते. जे जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत 63 टक्के इतके आहे. भारतातही मोबाईलच्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. स्वत:ला कसे सुरक्षित ठेवाल?मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा. वायरलेस ब्लुटुथ वापरा अथवा इयर फोन वापरा, फोन कॉल कमी वेळेचा करा अथवा जास्तीत जास्त संदेश (एसएमएस) वापरण्यावर अधिक भार द्या.