शिरपूर । सूक्ष्मदर्शकाचा वापर मानवी रक्तपेशी, सूक्ष्मजीव, वनस्पतींची ऊती व इतर सूक्ष्म वस्तूंच्या वैज्ञानिक निरीक्षणासाठी होतो. सदर निरीक्षणास विद्यार्थ्यांचे कौशल्यपणाला लागते. तसेच सामान्य सूक्ष्मदर्शकातून फक्त एकाच व्यक्तीस निरीक्षण करता येते. या अडचणीवर मात करण्यासाठी आर. सी. पटेल वरिष्ठ महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचा विद्यार्थी प्रशांत लोहार याने विभागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक उपकरण बनविले आहे.
शिक्षकांचे मानले आभार : प्रशांत लोहार याने कल्पकता दाखविल्याने एक सुक्ष्मदर्शकाचा वापर अनेक व्यक्तींना करता येणार आहे. एका विद्यार्थ्यांना सर्वांना उपयोगी असे उपकरण बनविल्याने त्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. प्रशांत याच्या संशोधानाने सुक्ष्मदर्शकच्या वापरात सुसुत्रता येणार आहे. हे संशोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणार असल्याचे लोहार याने स्पष्ट केले. त्याने पटेल महाविद्यातील शिक्षकांचे आभार मानले आहेत.
लोहारचे सर्वत्र कौतुक : मोबाईलद्वारे सुक्ष्मदर्शकातील निरीक्षण नोंदविणारे उपकरण बनवीले आहे. हे उपकरण बनवून प्रशांत लोहार याने केलेल्या या प्रयोगात्मक रचनाशील उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. डी. आर पाटील आदी मान्यवरांनी केले आहे.
मोबाईलमध्ये छायाचित्र जतन
हे उपकरण सहजपणे सूक्ष्मदर्शकाला जोडता येते. त्यानंतर विद्यार्थी आपला स्वतःचा मोबाईल वापरून मोबाईलच्या आधारे निरीक्षण नोंदवू शकतो. विशेष म्हणजे सूक्ष्मदर्शकातील छायाचित्राचे एकाच वेळेस अनेक व्यक्ती निरीक्षण करू शकतात व सूक्ष्मदर्शकातील छायाचित्राचे जतनही मोबाईलमध्ये करू शकतात. हे उपकरण साध्या वस्तू वापरुन अत्यल्प दरात बनविले आहे. मोबाईलद्वारे सूक्ष्मदर्शकातील निरीक्षण नोंदविणार्या उपकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक निरीक्षणाची आवड निर्माण होईल.