मोबाईलमुळे मैदानी खेळांचा विद्यार्थ्यांना विसर -परीक्षीत बर्‍हाटे

0

भुसावळ- मोबाईलमुळे विद्यार्थी हे मैदानी खेळ विसरत चालले आहे. मैदानी खेळ खेळल्याने मानसिक व शरीरीक स्वास्थ उत्तम राहते. मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळांना प्राधान्य द्या, असे आवाहन संस्थाध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांनी येथे केले. पुंडलिक गणपत बर्‍हाटे माध्यमिक विद्यालय, स्वातंत्र्य सैनिक कृ. पा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर व सुमनताई बर्‍हाटे पूर्व प्राथमिक विद्यामंदिराच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे आधारवड पुंडलिक काका बर्‍हाटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेत दोन दिवसीय शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बर्‍हाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष पुंडलिक बर्‍हाटे, संस्थेचे सचिव सुभाष दामू बर्‍हाटे, संचालक यशवंत दोधू भंगाळे, माध्यमिक मुख्याध्यापक सुधीर पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी उपस्थित होत्या.

खेळामुळे शरीराला बळकटील -सुभाष बर्‍हाटे
संस्थेचे सचिव सुभाष दामू बर्‍हाटे म्हणाले की, खेळामुळे शरीराला बळकटी तर मिळतेच शिवाय आरोग्यही उत्तम राहते. खेळत असताना जिंकणे वा हरणे हे तर सुरूच असते. आपण निराश न होता नव्या उमेदीने जिंकण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. यानंतर खेळाडूंसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. सुदृढ नवी पिढी घडविण्यासाठी खेळाबाबत सामूहिक प्रतिज्ञा क्रीडा शिक्षक ए.एम.बोरोले यांनी घेतली. कबड्डी, खो-खो, थाळीफेक, रनिंग, भालाफेक , बुद्धीबळ आदी खेळांच्या स्पर्धा घेण्यात येत आहे. सूत्रसंचलन ममता फेगडे तर आभार हेमांगिनी चौधरी यांनी मानले.