पिंपरी : रस्ता सुरक्षा पंधरवडा नुकताच विविध उपक्रमांनी उत्साहात संपूर्ण शहरात राबविला गेला. विनाकारण हॉर्न वाजवू नये, सीटबेल्ट लावून गाडी चालवावी, वाहतुकीचे नियम पाळावेत आदी नियमांबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणारे उपक्रम राबविले. या दरम्यानच मोबाईलवर बोलत गाडी चालविताना दिसल्यास त्या वाहनचालकाचे परवाना जप्त केला जाईल, असे सांगण्यात आले. तरीही याचा कुठलाच परिणाम वाहनचालकांवर झालेला नाही. त्यामुळे वाहतूक विभागातर्फे 15 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे परवाने जप्त करून पुढील कारवाईसाठी वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविले आहेत.
सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई
वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका, अशा सूचना अनेकदा वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात. त्याबाबत जनजागृतीही केली जाते. मात्र वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरात सध्या रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. वाहतूक व शहर पोलिसांसह काही स्वयंसेवी संस्था, कंपन्यांतर्फे वाहनचालकांमध्ये जागृती केली जात आहे. तरीही मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे सर्रास दिसून येत आहेत. अशा वाहनचालकांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. काही वाहनचालकांना समज दिली. सुमारे 15 जणांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला. प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल केला. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
अशी होणार कारवाई
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र निंबाळकर म्हणाले की, वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास 200 रूपये दंड आकारला जातो. वाहनचालकाचा परवाना वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यांच्याकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) माहिती दिली जाते. आरटीओकडून वाहनचालक परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही केली जाते.