मोबाईलवर संशयास्पद कॉल : दहिगावच्या तरुणाची एटीएसकडून चौकशी

0

यावल- मोबाईलवर आलेल्या संशयास्पद कॉल प्रकरणी यावल तालुक्यातील दहिगाव येथील तरुणाची दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वी साकळीमध्येनंतर रावेर तालुक्यातील चिनावल आणि आता पुन्हा दहिगावात कारवाई झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दहिगाव येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एटीएस पथक दाखल झाले. अधिकार्‍यांनी गावातील रहिवासी शेख रफिक शेख सुलेमान यांचा भाचा अमीर हमीद मिस्तरी याला ताब्यात घेतले तसेच शेख रफीक पठाण यांच्याकडे तरुणाविषयी चौकशी केली. नंतर पथक संशयित तरुणाला रावेर मार्गावर घेऊन गेले. दरम्यान, एटीएसने चिनावल येथून मंगळवारी रात्री हमीद इब्राहीम मिस्तरी व शोएब हमीद मिस्तरी या पिता-पुत्राला ताब्यात घेतले होते. दोघांची चौकशी करून त्यांना दुसर्‍या दिवशी बुधवारी सोडून देण्यात आले होते. दहिगाव येथून ताब्यात घेतलेला अमीर हा हमीद इब्राहीम मिस्तरी यांचा मुलगा आहे. हमीद यांनी आपल्या नावावर घेतलेले सीमकार्ड दहिगाव येथे राहणार्‍या मावशीला दिले होते. त्या सीमकार्डवर संशयास्पद कॉल आले होते. यावरून एटीएसने दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अधिकार्‍यांनी अमीर, शोएब आणि हमीद या तिन्ही पिता-पुत्रांना शुक्रवारी सायंकाळी चिनावल येथे सोडून दिले.