मोबाईलवर ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करा

0

महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नागरिकांचा सहभाग वाढण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महिला प्रशिक्षकांची कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. केंद्रशासनाने विकसित केलेला स्वच्छता अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड नागरिकांनी करून शहर स्वच्छतेत सहभाग द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका आशा शेंडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आदी उपस्थित होते.

स्वच्छता दूत बना
सावळे म्हणाल्या, जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छता अ‍ॅपव्दारे शहरातील स्वच्छता विषयक समस्या महापालिकेकडे पाठवाव्यात. तसेच त्यावर महापालिका 24 ते 48 तासात कार्यवाही करेल महापालिकेचे स्वच्छता दूत म्हणून सर्वांनी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेत सहभागी होणार्‍या महिलांचा गौरव करण्यात येईल.

तक्रारींचे 24 तासांत निराकरण
आयुक्त हर्डीकर म्हणाले, स्वच्छतेमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे. स्वच्छते बरोबरच डिजिटल साक्षरता महत्वाची असून महिलांनी त्यामध्ये पुढे यायला हवे. गरीब महिलांना त्यांचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी व त्याबाबतची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारचा स्वच्छता अ‍ॅप महत्वाचा आहे. त्यामुळे कचरा, ड्रेनेजसह स्वच्छता विषयक तक्रारी घरबसल्या करता येणार आहेत. त्याचे निराकरण महापलिका 24 ते 48 तासात करणार असून त्यासाठी सर्व महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करावा.प्रास्ताविक सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.