जळगाव । शहरातील मध्यवती भागात महापालिकेच्या मागील बाजूस असलेले गोलाणी मार्केट सध्या मोबाईल बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. विओ आणि ओपो कंपनीचे लाईट लावलेले फलक नागरिकांना आकर्षित करीत असताना दुसरीकडे बेकायदेशीर पणे फलक लावण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. कायद्या नुसार महापालिका या गाळ्याची मालक असून दुकानापुढे एकच फलक लावण्याची परवानगी देण्यात येते. मात्र मोबाईल दुकान नाहीतर इतर वस्तू विक्री होणार्या दुकानावर देखील मोबाईल कंपन्याच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. यामुळे आश्रयव्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल कंपन्याच्या मार्केट मध्ये लावलेल्या जाहिराती मागे मनपामधील कोण्याएका अधिकार्याचा आशीर्वाद असल्याचे सांगण्यात आले आहे. मनपा प्रशासनाकडून कडून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
उच्च न्यायालयाचे आदेश
पोलिस व महापालिका प्रशासनाच्यावतीने संयुक्त धडक मोहीम राबवून अवैध पोस्टर्स, बॅनर्स व जाहिरात लावणार्यांवर विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. हाच गुन्हा गोलाणी मार्केट मध्ये लावलेल्या फलकां वरच्या कंपनीला लागू होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने कारवाई करणे गरजेचे असल्याचा अभिप्राय नागरिक देत आहे.
विरोधक आणि सत्ताधार्यांचे मौन
महापलिकेच्या महासभेत नगरसेवकांनी किंवा विरोधकांनी याबाबत आवाज उठवला, तर त्वरित कारवाई होऊ शकते. परंतु, विरोधक सत्ताधारी दोघेही याबाबत मौन बाळगून असल्याने झारीतील शुक्राचार्य कोण? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा 1995 या कायद्याने असे अवैध फलक लावणा:यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करता येतात. महापालिकेने जाहिरात फलकांवरील कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वीत असताना अद्याप पर्यत कार्यवाही झाली नसल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कंपनीचा उद्देश होतोय साध्य
गोलाणी मार्केटमध्ये विओ आणि ओपो कंपनीचे जाहिरातींचे फलक, फ्लेक्स उभारण्यात आले असून, यापैकी कित्येक होर्डिंग्ज, फ्लेक्स हे बेकायदेशीर आहेत. फलकांमुळे जाहिरात करणार्या कंपनीचा उद्देश सफल होत असला तरी नागरिकांना होणार्या त्रासामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पैशाचे आमिष ?
मोबाईल विक्री करणार्या व्यापार्याना कंपनीकडून मोठे पैशाचे आमिष देण्यात आले. दुकानाच्या बाहेरील भागात हे फलक लावण्यात आल्याने संपूर्ण गोलाणी मार्केटच्या मुख्य प्रवेश मार्गाकडे विओ आणि ओपो कंपनीचे फलक लावण्यात आले आहे. दुकानापुढे फलक लावल्यास प्रथमच अशी सुवर्णसंधी चालून आल्याने विक्रेत्यांनी देखील चागलाच फायदा मोबाईल कंपनीकडून घेतलेला दिसून येत आहे. वेगळ्या पद्धतीने मोबाईलच्या जाहिराती रंगविण्यात आल्या आहे. गोलानीचा संपूर्ण पहिला मजल्याचा भाग बेकायदेशीर फलकांनी व्यापला असून मोबाईल कंपनीवर तत्काळ कार्यवाही होण्याची गरज आहे.