मोबाईल कॉलचे सीडीआर काढणार्‍या खासगी गुप्तहेरांना अटक

0

ठाणे । बेकायदेशीर आणि गैरमार्गाने नागरिकांच्या मोबाईल कॉलचे सीडीआर काढणार्‍या खाजगी गुप्तहेरांच्या टोळीला ठाणे पोलिंसानी अटक केली आहे. खाजगी गुप्तहेर नागरिकांच्या मोबाईलमधील सीडआर काढत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून चौघांना अटक केली आहे.पोलीस पथकाने कळव्याच्या शिवाजीनगर येथील नाना-नानी पार्क परिसरात सापळा रचला. यात पोलिसांनी सावज टिपत मुकेश माधवन पांडियन (वय-42वर्षे) याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नागरिकांचे मोबाईल सीडीआर बेकायदेशीर काढणारे आणि खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सी चालविणारे आरोपी प्रशांत श्रीपाद पालेकर (वय-49वर्षे), जिगर विनोद मकवाना (वय-35वर्षे) आणि समरेश नंनटून झा उर्फ प्रतीक मोहपाल (वय-32वर्षे) यांना अटक करण्यात आली.

संगणक, लॅपटॉप, मोबाईल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून या कामासाठी वापरात आणलेले 3 संगणक, 2 लॅपटॉप, 11 मोबाईल हस्तगत केले. या चौकडीने आतापर्यंत नागरिकांच्या मोबाईलचे काढलेले सीडीआरच्या 177 फाईली पोलिसांना हस्तगत करण्यात यश लाभले. पोलिसांच्या माहितीनुसार सदर मोबाईलचे सीडीआर आरोपींनी दिल्ली येथील सौरव साहू यांच्या संपर्कातील मुंबईतील हस्तक क्लिगं मिश्रा, किर्तेश कवी, शीतल शर्मा यांच्या माध्यमातून काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुरुवारी आरोपींना पुन्हा न्यायालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपायुक्त गुन्हे अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. मोबाईल सीडीआर प्रकरणात आयपीएस लॉबीचा समावेश असण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.