मोबाईल खरेदी करण्याच्या बहाणा करून महागडे मोबाईल लांबवले : गुजरातच्या पिता-पुत्रास अटक

जळगाव : गोलाणी मार्केटमधील मोबाईल दुकानात मोबाईल खरेदी करण्याच्या बहाणा करून तब्बल एक लाख 65 हजार 170 रुपये किंमतीचे महागडे 11 मोबाईल चोरी करणार्‍या गुजरातमधील पिता-पुत्राला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केली. कैलास श्रीबलराम लालवाणी (48) आणि सुमित कैलास लालवाणी (23, रा.वारसीया परीसर सिंधी कॉलनी, बडोदरा, गुजरात) अशी दोघा पिता-पुत्रांची नावे आहेत.

महागडे मोबाईल लांबवत पोबारा
जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील गुरूकृपा मोबाईल केअर या दुकानावर संशयित आरोपी कैलास लालवाणी आणि सुमिल लालवाणी मंगळवार, 14 जून रोजी दुपारी आले. मोबाईल घेण्याचा बहाणा करून त्यांनी तब्बल 1 लाख 65 हजार रूपये किंमतीचे महागडे 11 मोबाईल लांबविले. याबाबत बुधवार, 15 जून रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यानंतर चोरी मोबाईल घेवून संशयित आरोपी पिता-पुत्र मुंबईच्या दिशेने रेल्वेने गेल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेण्याकामी सहायक फौजदार रवि नरवाडे, स. फौ. युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ संदिप पाटील, पोना, प्रविण मांडोळे आदींचे पथक याकामी रवाना करण्यात आले. लोहमार्ग पोलीस स्टेशन नाशिक व रेल्वे सुरक्षा बल नाशिक यांच्याशी संपर्क साधून दोघा पिता पुत्रांना नाशिक येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

अट्टल पिता-पूत्रांविरोधात ठिकठिकाणी गुन्हे
दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांच्यावर मध्यप्रदेशातील इंदौर येथील पोलीस ठाणे आणि जोतपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शिवाय अकोला, मुंबई, पुणे, कोटा अशा विविध शहरांमध्ये अशा प्रकारे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.