यावल– तालुक्यातील डोंगरकठोरा आश्रमशाळेतील नववीच्या विद्यार्थ्याने मोबाईल घेण्यासाठी चक्क आश्रमशाळा सोडून जळगावात एका हॉटेलमध्ये नोकर म्हणून नोकरी स्वीकारल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. 13 ऑक्टोबर रोजी दसर्यासाठी नायगाव येथे नातेवाईकांकडे आलेला हा विद्यार्थी 19 सप्टेंबर रोजी आश्रमशाळेत जाण्यासाठी निघाला होता मात्र तो आश्रमशाळेत न पोहोचल्याने यावल पोलिसात 30 ऑक्टोबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रकल्पाधिकार्यांनी आश्रमशाळा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
मोबाईलसाठी बनला तो ‘नोकर’
मोबाईलचे भूत अंगात शिरल्याने नववीच्या या विद्यार्थ्याने नायगावहून थेट जळगाव गाठत एका हॉटेलमध्ये नोकर म्हणून कामास सुरुवात केली. मिळणार्या पैशातून मोबाईल घेण्याचा या विद्यार्थ्याचा विचार होता मात्र लंगडाआंबा येथील नातेवाईकाच्या दृष्टीस हा विद्यार्थी पडल्यानंतर पालकांना कळवण्यात आले. आश्रमशाळा प्रशासनाने विद्यार्थ्याला शाळेत येण्याबाबत कळवले मात्र विद्यार्थ्याने नकार दिल्याने त्याचा पालकांना ताबा देण्यात आला.