मोबाईल चोरट्यास पोलिसांकडून अटक

0

जळगाव। अजिंठा चौफुलीवरील मानस हॉटेल समोर 14 मे रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी तरूणाचा मोबाइल हिसकावून नेला होता. या प्रकरणी बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास एका संशयिताना अटक केली. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर संशयिताचा जामीन मंजूर करण्यात आला.

तिघांविरूद्ध एमआयडीसीत चोरीचा होता गुन्हा
पिंप्राळा येथील तुषार विजय पाटील (वय 27) हे 14 मे रोजी कामानिमित्ताने अजिंठा चौफुली परिसरात गेले होते. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मानस हॉटेल समोर उभे असताना ने वडीलांशी मोबाइलवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्या मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी बुधवारी तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिस निरीक्षक कुराडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, रामकृष्ण पाटील, संदीप पाटील, किशोर पाटील, विजय पाटील, मनोज सुरवाडे यांना तपासासाठी पाठविले. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ललित उमाकांत दिक्षीत (रा. दिक्षीतवाडी) याला अटक केली. त्यावेळी त्याने चोरीची कबुली देत. त्याच्या सोबत आकाश अजय सोनार, गणेश भास्कर दंडगव्हाळ हे असल्याचेही त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. पोलिसांनी ललित दिक्षीत याला गुरूवारी न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने मंजूर केला आहे.

तोडफोड प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी
म्हसावद येथील हॉटेल आणि दारू दुकानाची गेल्या 7 मे रोजी तोडफोड केल्याप्रकरणी एमआयाडीसी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. म्हसावद येथील बोरनार रस्त्यावरील इंदिरा गांधीनगरात शेखर भगवान सोनवणे यांचे देशी दारूचे दुकान आहे. तसेच त्यांच्या दुकानाच्या बाजुला हॉटेल निलम आहे. 7 मे रोजी रात्री 8 वाजता गणेश शांताराम आमले (वय 36), विजय शांताराम आमले (वय 41) बबलू उर्फ सादीक सलीम बागवान (वय 22), आबा लहानू घुले (वय 40) यांनी दारूच्या दुकानात आणि हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करून कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची फिर्याद किरण शांताराम साळुंके याने दिली होती. त्यावरून पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपली. त्यांना न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांनी दाखल केलेले जामिनासाठीचे अर्ज मंजूर केले. सरकारतर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी तर संशयितातर्फे अ‍ॅड. सचिन पाटील यांनी काम पाहिले.