मोबाईल चोरत दरोडेखोरांचा रेल्वे प्रवास

0

जळगाव । शहर पोलिसांच्या पथकाने गुरूवारी दुपारी रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल निसर्गच्या मागच्या बाजुला दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या सुरत येथील चार अट्टल गुन्हेगारांना काही तरूणांच्या मदतीने अटक केली. यातच या चोरट्यांनी सुरत भुसावळ पॅसेंजरमध्येही जबरी चोर्‍या केल्याचे समोर आले आहे. रेल्वेत चोर्‍याकरून शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यात दोन प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर दोघांना कायमचे अपंगत्व आले. मात्र तरीही पाहिजे त्या प्रमाणात रेल्वेतील गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याचे गुरूवारच्या घटनेवरून दिसून आले आहे. या चौघांची शहर पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

चोरट्यांचा रेल्वेत रात्रभर धिंगाणा
सुरत येथून निघालेल्या सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये बुधवारी रात्री सात ते आठ गुन्हेगारांचे टोळके रात्र भर धिंगाणा घालत होते. टोळक्याने अनेक जणांकडून मोबाइल तसेच पैसेही हिसकावण्यास सुरूवात केली. ज्यांनी त्यांना विरोध केला त्यांना रेल्वेतून फेकून देण्याची धमकी देत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीच बोलण्याची हिम्मत करीत नव्हते. अमळनेर येथून लक्ष्मण पौलाद कोळी (वय 40, रा. हिंगोणेसीम, ता. अमळनेर) हे कुटुंबियांसह गुरूवारी सकाळी 7.30 वाजता पॅसेंजरमध्ये बसले. त्यांना भुसावळ येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी जायचे होते. सुरतहून बसलेल्या गुन्हेगारांच्या टोळक्याने धरणगावजवळ लक्ष्मण कोळी यांना मारहाण करून त्यांच्याकडचा मोबाइल आणि पैसे हिसकावले. त्यांचे एक वृद्ध नातेवाईक त्यांना समजावण्यासाठी गेले असता त्यांनी रेल्वेतून फेकून देण्याची धमकी दिली. त्यावेळी लक्ष्मण कोळी यांनी जळगावातील त्यांच्या नातेवाईकांना फोनकरून माहिती दिली. मात्र पिंप्राळा रेल्वेगेट जवळ रेल्वे थांबल्याने या चोरट्यांनी उतरून पळ काढला.

शहरात दरोड्याच्या प्रयत्नात होते चोरटे
लक्ष्मण कोळी यांचे नातेवाईक रेल्वे स्थानकावर वाट बघत होते. मात्र चोरटे रेल्वे थांबल्याने पसार झाले. त्यानंतर कोळी यांचे नातेवाईक भगवान काशिनाथ सोनवणे, सुनील दुर्योधन सैंदाणे, मुन्ना उर्फ रतिलाल संतोष सोनवणे, शुभम रघुनाथ तायडे यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना काही तरूण रेल्वे स्थानक परिसरात दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक आशीष रोही, वासुदेव सोनवणे, विकास महाजन, प्रितम पाटील, सुनील पाटील, दुष्यंत खैरनार, अमोल विसपुते, नवजीत चौधरी, दीपक सोनवणे यांच्या पथकाला पाठविले. पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके तयार केली. कोळी यांचे नातेवाईकही त्याच गुन्हेगारांना शोधत होते. ते निसर्ग हॉटेलच्या मागच्या बाजुला असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने आणि तरूणांनी या चोरट्यांना निर्सग हॉटेलच्या मागच्या बाजुला पकडले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेले चारही चोरटे सुरत येथील असल्याचे समोर आहे. त्यांची नावे शेख कादीर शेख इब्राहीम (वय 20), वसीम शेख अजीम शेख (वय 21), अफजल शहा इस्माईल शहा (वय 18), शेख शब्बीर शेख मोहंमद (वय 18) अशी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर सुरत तसेच रेल्वे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत.