मोबाईल चोर जेरबंद

0

31 मोबाईल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे । चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आणलेल्या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट तीनच्या कर्मचार्‍यांनी स्वारगेट बसस्थानकातून शुक्रवारी अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे 31 मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले. अवेज परवेझ शेख (वय 19, रा. हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे.

पोलिस नाईक संदीप तळेकर यांना शेख चोरीचे मोबाईल विक्रीसाठी स्वारगेट बसस्थानक येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत शेखने स्वारगेट, शिवाजीनगर, गाडीतळ, हडपसर येथून ऐन गर्दीच्या वेळी बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचे कबूल केले.

2 लाखांचे मोबाईल जप्त
शेखच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे 2 लाख 96 हजार रुपये किंमतीचे 31 मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी हडपसर पोलीस ठाण्यात 4 तर शिवाजीनगर आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत 25 मोबाईल मालकांचा शोध सुरू आहे. वर नमूद केलेल्या ठिकाणाहून ज्यांचे मोबाईल चोरीला गेले असतील त्यांनी रेंजहिल्स रोड येथील गुन्हे शाखा युनिट तीन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.