पौड रस्ता वार्ताहर – पौड फाट्याजवळील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती मिळताच तातडीने कारवाई करत अवघ्या 15 मिनिटांत आग आटोक्यात आणली. पौड फाट्याजवळील आयडियल कॉलनीतील मोदी गणपती शेजारील सिटी मोबाईल दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दुकानासमोरील हॉटेलमधील लोकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. एक रेस्क्यू व्हॅन व दोन गाड्यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. दुकानात लाकडी पोटमाळा असल्याने थोड्याच वेळात आग मोठ्या प्रमाणात भडकली. त्यामुळे आग विझवेपर्यंत दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल व बॅटर्या तसेच फर्निचर जळून खाक झाले.