फैजपुर- मोबाईल नंबर न दिल्याचा राग आल्याने एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना अकलूद, ता.यावल येथे रविवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. चाकू हल्ल्यात सुकलाल काशिनाथ भील (22) हा तरुण जखमी झाला असून या प्रकरणी संशयीत सतीश रमेश सपकाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी सतीश सपकाळे याने सुकलाल भील यांच्याकडे त्याच्या साडूचा मोबाईल नंबर मागितला होता. मोबाईल नंबर न दिल्याने त्याचा राग येऊन सतीशने सुकलाल याच्या पोटावर चाकूने वार केला. या घटनेने अकलूज गावात एकच खळबळ उडाली. सुकलाल याला तातडीने भुसावळ येथे उपचारार्थ दाखल करून त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी सतीश सपकाळे यास ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेला चाकू सुद्धा हस्तगत केला आहे. जखमी सुकलाल भील यांच्या तक्रारीवरून सतीश सपकाळे विरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, फौजदार जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार विकास कोल्हे करीत आहेत.