भुसावळ ः नागरीकांकडील मोबाईल लांबवणार्या बिहार व झारखंड राज्यातील सहा जणांच्या टोळीच्या मुसक्या रामानंद नगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी जळगावसह भुसावळातून आवळल्या. ताब्यात घेतलेल्या संशयीतांमध्ये दोघा अल्पवयीनांसह अन्य चार आरोपींचा समावेश आहे. नागरीकांकडील महागडे मोबाईल लांबवण्यात आरोपींचा हातखंडा असून त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपी दोन दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यातून चोर्या करून जिल्ह्यात परतल्याची दाट शक्यता आहे.
भुसावळसह जळगावातून आवळल्या मुसक्या
जळगावच्या पिंप्राळा भागातून आरोपींनी काही नागरीकांचे मोबाईल लांबवल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील प्रदीप चौधरी, सागर तडवी, अतुल पवार यांना कळल्यानंतर त्यांनी गस्त वाढवत तिघांच्या मुसक्या आवळल्या तर अन्य तीन साथीदार भुसावळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील यांच्या सहकार्याने भुसावळ रेल्वेस्थानक व जाम मोहल्ला भागातून तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
जिल्ह्यातील चोर्यांचा उलगडा होणार ?
अटकेतील आरोपी अट्टल असल्याची प्राथमिक माहिती असून आरोपींनी यापूर्वी नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चोर्या केल्यानंतर सोमवारीच जळगाव गाठले तर बुधवारी जळगावच्या फुले मार्केटमध्येही आरोपींनी हात मारला असल्याची दाट शक्यता आहे. आरोपींविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात जिल्ह्यातील काही चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. आरोपी अकोला येथे राहत असल्याची माहितीदेखील प्राप्त झाली आहे.