मोबाईल वेडामुळे युवावर्ग कुटुंब नि वाचनापासून दूर

0

आताच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात स्मार्ट, अँड्रॉईड आणि आणखी सोयी सुविधा असलेल्या मोबाईलचे महत्व आणि गरज सर्वश्रूत आहे. संभाषणाबरोबरच त्याचे अनेक उपयोग आहेत आणि नवनव्या अ‍ॅपसह अपग्रेड होणारे मोबाईल संच आणि विविध प्रकारच्या सेवा पुरविणार्‍या कंपन्यांना मोबाईल ग्राहकांची असलेली पसंती यातून स्पर्धा निर्माण झाली असली तरी मागणीही वाढतेच आहे. अनेक प्रकारे उपयोगाची आणि गरजेची म्हणून ठरलल्या या मोबाईल सेवेचा लाभ घेण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात अधिकाधिक वेळ व्यस्त असल्याचे दिसून येते. त्यात त्यांना खरेच उपयोगाचे किंवा आवश्यक किती हे ज्याचे त्यांनाच माहित परंतु एकूण स्थिती पाहता हीच तरुणाई आता या मोबाईलवमुळे अभ्यासाकडे, वृत्तपत्र वाचन अगदी टिव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रम, बातम्या आदीपासून दूर होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. प्रवासात वा अन्य ठिकाणी टाईमपास म्हणून मोबाईलवर राहणे समजण्यासारखे आहे मात्र घरातही मुख्य कामे आटोपली की अनेकजण मोबाईलवर राहतात; यामुळे कुटुंबातील सदस्यांचा संवाद कमी होत चालला आहे, परिणामी कौटुंबिक अडचणू, प्रश्‍न वा अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होतेच असे नाही. अशा सारख्या गोष्टी कौटुंबिक वातावरणाला अहितकारक ठरु शकतात हे कोणी कोणाला सांगायचे?

कॉलेज, ऑफिस वा अन्य नियमित कामे आटोपली की अनेक जण प्रवास नि घरातही मोबाईलवर असल्याचे दिसून येते. अशा प्रकारचे हे मोबाईलवेड वा त्याच्या अतिआहारी जाणे संबंधितांसाठी चुकीचे, धोक्याचे आणि नुकसानकारही ठरु शकते, हे त्यांच्या केव्हा लक्षात येणार? मोबाईल हे आपल्यासाठी असून त्याच्यासाठी आपण नाही, त्यामुळे त्याच्या किती आहारी जायचे, त्याचा किती वेळ वापर करायचा आणि तो करताना वेळेचे भान ठेवायला हवे अन्यथा असे मोबाईलच्या आहारी जाणे प्रकृतीसह आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवरही हानीकारक आहे, अनेक महत्वाच्या गोष्टी दूर सारत आपण आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत आहोत हे संबंधितांच्या लक्षात येत नाही. तरुणाईला हे सांगणार कोण? त्यांची तर वृत्तपत्र वाचन, टिव्ही वाहिन्यांवरील बातम्या वा अन्य माहितीपूर्ण कार्यक्रमांकडे यामुळे पाठ फिरली असून आई, वडील, बहिण भाऊ नि अन्य सदस्य यांच्याशी बोलणेही अवघड बनले आहे. अगदी कॉलेजच्या तरुणाईचीच अवस्था नसून काही शाळकरी मुलांकडे पाहिल्यावरही यापेक्षा वेगळे चित्र पहावयास मिळत नाही. या सार्‍याचा परिणाम अभ्यासावर होत असून अर्थात परिक्षेत उत्तीर्ण होणे, न होणे, अपेिति गुण मिळणे, न मिळणे यावर होत असून एकूण दृष्ट्याच शैक्षणिक नुकसान या मोबाईलवेडामुळे होत असते, होऊ शकते हे त्या विद्यार्थी दशेतील बालकांना सांगायचे कोणी?

अत्याधुनिक मोबाईलवर मेल, चॅटींग, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, यु ट्युब, फोटो आदी सुविधा उपलब्ध असल्याने त्यातच विश्‍व मानणारा हा मोबाईलवेडा वर्ग स्वत:सह कुटुंबाचेही नुकसान करीत असतो. आता तर व्हॉटस् गृपमधून मिळालेली माहिती वाचणे, फोटो पाहणे, त्यावर कमेंट करणे अत्यंत प्रिय वाटत असून ही मंडळी विशिष्ट कक्षेतच वावरत असतात. अन्य अवांतर वाचन, माहिती अशा गोष्टींतून त्यांच्या ज्ञानात भर पडणे थांबले आहे, हे त्यांच्या कसे लक्षात येत नाही? त्यामुळे वेळीच अशा गोष्टींपासून सावरणे आवश्यक असून अशा आहारी जाण्यापासून स्वत:वरच नियंत्रण राखणे गरजेचे आहे. केवळ गरजेपोटीच मोबाईचा वापर करणे हिताचे ठरणार आहे. ही गोष्ट पहिल्यांदा अवघड वाटत असली तरी अशक्य नाही. अन्यथा कुटुंबातील संवाद संपतील, माणसे एकमेकांपासून दुरावत जातील आणि तरुणाईसह शालेय विद्यार्थीही धक्याच्या वळणावर जाऊ शकतील, त्यावेळी त्यांना सावरणेही कठीण किंबहुना त्यांनाही सुधारेवेसे वाटले तरी वेळ निघून गेलेली असेल. हे सारे धोके लक्षात घेता मोबाईलवेडामुळे कुटुंबासह वाचनापासून दूर चाललेल्या कॉलेजमधील वा युवावर्ग आणि शालेय विद्यार्थी वर्गानेही वेळीच स्वत:सह कुटुंबालाही सावरंणे आवश्यक आहे. अलिकडच्या काळातील कुठलीही भौतिक नि गरजू वस्तू अव्यहार्य किंवा अडचणीची नि त्रासदायी वाटणार नाही. गरज म्हणूनच तिची निर्मिती केलेली असते. मात्र ज्याचा त्याचा वापर त्यासाठीच आणि अति करणे घातक ठरु शकते, हे सत्य कोणीही नाकारणार नाही. मोबाईलचे फायदे नि एकूणच त्याचा उपयोग याबाबतही कोणी वाद गालणार नाही. मात्र माणूसच काही गोष्टींचा अतिरेक करतो नि त्याचे ते कृत्य त्याच्या जीवाशी खेळणारे, नुकसानकारक नि प्रसंगी जिवावर बेतणारेही ठरत असते. मोबाईलवेडही असेच चांगल्या गोष्टींपासून दूर नेणरे ठरु शकते. म्हणून सावधानता हवीच!

– रामनाथ चौलकर