शिंदे वासुली – वासुली ( ता.खेड) येथे चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय आणि कै.भागुबाई पिंगळे कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय चाकण यांचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानमाला कार्यक्रमात महाळूंगे इंगळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के बोलत होते.
पोलीस निरीक्षक सोनटक्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वच्छता, श्रमदान, समाजसेवा आदी गुणांचे संस्कार होऊन देशसेवेसाठी एक संस्कारक्षम, कृतीशील तरुण पिढी निर्माण होण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता आहे. युवा पिढी विशेषतः वय वर्षे १८-२० पर्यंतच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाईल व इ़ंटरनेटचा अतिवापर टाळावा. आवश्यक माहिती मिळवण्यासाठीच मोबाईल व इ़ंटरनेटचा उपयोग करावा. परंतु सध्यस्थिती खुप भयावह आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण समाज घातक आहे. मुलींनी स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन काही अप्रतिम घटनेचा अंदाज आल्यास आम्हाला तात्काळ संपर्क करावा. आम्ही अल्पवयीन मुलांच्या बालगुन्हेगारीकडे वाढलेला कल किंवा बालगुन्हेगारीचे प्रमाण कमी करुन ती अपप्रवृत्ती समुळ नष्ट करणार, महिला मुलींच्या सुरक्षेची कडक अंमलबजावणी करुन समाजात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहोत.
यावेळी वासुलीचे माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख, शिवसेना संपर्कप्रमुख अमोल पाचपुते, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोहन पाचपुते, श्रीधर पाचपुते, अंकुश शेळके, दत्ता शिंदे, सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ. दत्तात्रय तांबे, खेड तालुका रा.से.समन्वयक, सह अधिकारी प्रा.भरत बिरेगळ, डॉ. रविंद्र रसाळ, प्रा.विकास देशमुख, प्रा.दिलीप पवार, संदीप सोनवणे, प्रा.अफरीन इनामदार, दोन्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी सर्व विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास तात्काळ संपर्क करण्यासाठी आपला मोबाईल नंबर देऊ केला. सोनटक्के साहेबांनी चांगले मार्गदर्शन केल्यामुळे सेवा योजनेचे अधिकारी, समन्वयक व सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.
Prev Post