मोबाईल, संगणकापेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य द्या : आ.अनिल गोटे

0

धुळे । शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी युवा पिढीने मोबाईल अथवा संगणकावरील खेळांपेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे असे आवाहन शहराचे आमदार अनिल गोटे यांनी आज केले.जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्डकप स्पर्धा 6 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे या ऐतिहासीक स्पर्धांच्या अनुषंगाने क्रिडा संस्कृती रुजावी याकरिता आयोजीत फुटबॉल स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी आमदार श्री.गोटे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनिस, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रईस काझी आदि उपस्थित होते.

मैदानी खेळाच्या संदर्भात मान्यवरांचे मार्गदर्शन
आ. श्री.गोटे म्हणाले की, महाराष्ट्र मिशन 1-मिलियन ची घोषणा करुन देशभरात आज फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. इ-गॅझेटकडे शालेय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला असून मैदानी खेळांचे प्रमाण कमी होत आहे. आजची युवा पिढी विविध खेळांचे सामने मैदानावर कमी तर मोबाईल किंवा संगणकावर अधिक प्रमाणात खेळतांना दिसतात. त्यामुळे मुलांनी मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी फुटबॉल स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत म्हणाले, मैदानी खेळांमुळे युवा पिढीचे शरीर व मन स्थिर होण्यास मोठी मदतच होणार आहे. जिल्ह्याभरात होणार्‍या या स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी पारितोषीके प्राप्त करुन जिल्ह्याला नावलौकीक मिळवून देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनिस यांनी माहिती देतांना सांगितले, महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन फुटबॉल क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबवून जिल्हाभरातून 19 हजार क्रीडापटूंची नोंदणी करण्यात आली आहे. या स्पर्धांसाठी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलासह गरुड मैदानावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र मिशन 1-मिलियन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 445 शाळांमध्ये फुटबॉलचे वाटपही करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यांची होती उपस्थिती
क्रिडा मार्गदर्शक जगदीश राजेशिर्के, जगदीश चौधरी यांचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्ह्यातील विविध विद्यालयातील क्रीडा प्रशिक्षक हेमंत भदाणे, प्रभाकर चौधरी, मनोहर चौधरी, संदीप बावीस्कर, बागुल, शिंदे, एस.पी.पाटील, तर पंच, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.