मोबाईल हिसकाविण्याच्या प्रकारात वाढ

0

बिबवेवाडी । गेल्या काही महिन्यांमध्ये शहर आणि उपनगरात मोबाईल हिसकाविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि.3) चोरट्यांनी एकाच परिसरात दोन पादचार्‍यांचे 15 हजार रुपयांचे दोन मोबाईल हिसकावून पळ काढला. बिबवेवाडी परिसरातील पुष्पमंगल चौक आणि महेश सोसायटी येथे या घटना घडल्या. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या घटनेत बिबवेवाडी येथे राहणारी 26 वर्षीय महिला रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास महेश सोसायटी चौकातून तिच्या भावासह पायी जात होती. त्यावेळी त्यांच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन त्यांच्या हातातील 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. याबाबत सदर महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसर्‍या घटनेत धवन नेहते (वय 20) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नेहते हे संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास पुष्पमंगल चौकातून पायी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळवून नेला. पोलिस उपनिरीक्षक मगर अधिक तपास करत आहेत.