मोरगाव । मोरगावसह परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. नाझरे धरणावर अवलंबून असलेली मोरगाव प्रादेशिक नळ योजना धरणातील साठा संपल्याने बंद झाली आहे. त्यामुळे या भागातील लोकांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी नसल्याने गावागावातील लोक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. तसेच महिलांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नाझरे धरणातील पाणीसाठा संपल्याने या योजनेवर अवलंबून असलेली मोरगाव, आंबी, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी, सायंबाचीवाडी आदी गावात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात पाणी नसल्याने आंघोळ, प्रांतविधी जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. परिसरातील मोरगाव व माळवाडी लोणी या ग्रामपंचायतींनी या संदर्भात टँकरसाठी ठराव दिलेला आहे.
सध्या हे ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात असून आज किंवा उद्या या दोन गावांना टँकर मिळण्याची शक्यता असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कोकरे यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी या संदर्भात पाहणी करून जेजुरी एमआयडीसीचे पाणी या योजनेवरील गावांना तात्काळ मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू केली आहे.