मोरया युथ फेस्टिव्हल’चे शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

0

देवेंद्र फडणवीस साधणार तरुणाईशी राजकारण विरहीत मुक्त संवाद

पिंपरी :- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असणार्‍या विविध कलागुणांना मुक्त व्यासपीठ मिळवून देणारी पिंपरी चिंचवडमधील कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे आयोजन कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ड. सचिन पटवर्धन यांनी केले आहे. या वर्षीच्या ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.11) सकाळी 9.30 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे.


यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, नगरसेवक बाबू नायर, कामगार नेते इरफान सय्यद आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रात फडणवीस हे उपस्थित तरुणाईशी राजकारण विरहीत विविध विषयांवर मुक्त संवाद साधणार आहेत. अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक सदाशिव खाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

या वर्षी आयोजित केलेल्या विविध 28 स्पर्धांमध्ये शहरातील 4 हजारांहून युवक युवतींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बुध्दीबळ, कॅरम, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कथा लेखन, कथा सादरीकरण, व्यंगचित्र काढणे, रायफल शुटिंग, टेबल टेनिस, फेशन शो, व्हॉलिबॉल, ऑन द स्पॉट पेंटींग, पोस्टर मेकिंग, एकांकिका, वेशभूषा नसताना एकांकिका सादरीकरण, मुक अभिनय, नकला सादर करणे, रांगोळी आणि मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. युथ फेस्टिव्हल आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी आयोजित केलेल्या फेस्टिव्हलचे उद्घाटन तत्कालिन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.