रावेर- राज्यस्तरीय आदिवासी प्राथमिक शिक्षक पुरस्कार मोरव्हाल (ता.रावेर) येथील जिल्हा परीषद मराठी मुलांच्या शाळेचे मुख्यध्यापक साहेबू मयबू तडवी यांना जाहीर झाला आहे. मोरव्हाल येथील जि.प.शाळा मुख्याध्यापक तडवी यांची शासकीय सेवा 34 वर्षे झाली असून ते मूळ पाल (ता.रावेर) येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण पाल येथील आश्रमशाळेत झाले असून सुरुवातीला टाकळी येथे 14 वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी रावेर तालुक्यातील कन्या शाळा, केर्हाळा येथे 9 वर्षे सेवा बजावली. तेथून जि.प.शाळा मंगरूळ येथे तीन वर्षे सेवा दिली. 16 मार्च 2011 पासून जि.प.शाळा मोरव्हाल येथे ते सेवेत आहे. मोरव्हाल हे सातपुड्यातील आदिवासी 100 टक्के पेसा गाव आहे. या गावातील आदिवासी मुला मुलींना मराठी शाळेच्या माध्यमातून ज्ञानाचा झरा पोहचवण्याचं काम त्यांच्या कडून अव्याहतपणे सुरू आहे. मोरव्हाल येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम हे त्यांच्या काळात झाले आहे. त्यानंतर लोक सहभागातून त्यांनी एक संगणक विकत घेतले आहे. कॅनरा बँक शाखा, रावेर यांच्याकडून आदिवासी मुलींना ज्ञानजोती सावित्रीबाई फुले कॅनरा बँक शिष्यवृत्ती मिळूवून देण्यात आली तर त्याच बँकेने मुलांसाठी आर.ओ.मशीन बसवून दिले. लक्ष्मी गॅस एजन्सी कडून गॅस कनेक्शन मिळवण्यात तसेच शाळा डिजिटल शाळा करण्यात आली शिवाय ज्ञान रचनावाद हा उपक्रम राबविण्यात आला. ‘ चला खेळूया’ या उपक्रमांतर्गत ‘खो खो’ संघाला जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक मिळाला. यात त्यांना गट शिक्षण अधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी त्यानंतर केंद्रप्रमुख रजनी रोजतकर यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुरस्कार जाहीर होताच तालुक्यातील शिक्षकांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.