भीषण पाणीटंचाईची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी गांभीर्याने घेतली दखल ; तातडीच्या उपाययोजना
रावेर- तालुक्यातील मोरव्हाल येथे चार ट्यूबवेल आटल्याने तसेच प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या विहिरीने तळ गाठल्याने 48 अंशाच्या पार्यात ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त सोमवारच्या अंकात ‘दैनिक जनशक्ती’ने प्रसिद्ध करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सोमवारी सकाळी पाणीटंचाईची संदर्भात महत्वाची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत गावाच्या जवळपास चांगली जलपातळी असलेली विहिर तातडीने अधिग्रहीत करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
‘जनशक्ती’च्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल
आदिवासी भागातील तहानलेल्या मोरव्हाल गावाला भेडसावणार्या पाणीटंचाईसंदर्भात ‘दैनिक जनशक्ती’ ने वास्तव समोर आणल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सोमवारी तातडीची बैठक घेऊन गावाची पाणी टंचाईची समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली. उत्तम जलपातळी असलेल्या विहिरीचे लवकरात-लवकर अधिग्रहण करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या. या बैठकीला पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे कापडे, मंडळ अधिकारी खारे, सरपंच अल्लाहुद्दीन तडवी, माजी उपसरपंच सिकंदर तडवी, पोलिस पाटील यूसुफ तडवी, ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी, तलाठी बारेला आदी उपस्थित होते.
पाण्यासाठी आली होती भटकंतीची वेळ
आदिवासी भागातील मोरव्हाल या गावाची सुमारे दोन हजार लोकसंख्या आहे. या गावाला एप्रिलमध्येच भीषण पाणी टंचाई समस्या जानवत आहे. गावामध्ये यापूर्वी चार ट्यूबवेल होत्या परंतु शेकडो फूट खाली खोदुन सुध्दा पाणी लागले नसल्याने गावाच्या शेजारी असलेल्या शेतातील विहिर काही महिन्यांपूर्वी अधिग्रहित करण्यात आली परंतु तिचीदेखील जलपातळी घसरल्याने आदिवासी बांधवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती.