ग्रामस्थांनी मानले अनिल चौधरी यांचे आभार
रावेर- तालुक्यातील मोरव्हाल गावात पाणीप्रश्न अनेक दिवसांपासून भेडसावत असताना भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी तातडीने गावात नविन दोन ठिकाणी ट्युबवेल करून समस्या सोडवल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. शासन व लोकप्रतिनिधींकडे गावातील पाणीटंचाईबाबत वारंवार सांगूनही समस्या सुटली नाही मात्र अनिल चौधरी यांनी दिलेल्या शब्दाला जागत दोनच दिवसात समस्या सोडविल्याने मोरव्हाल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे आभार मानले आहेत.
पाणीप्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनी मानले आभार
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पाल परीसरातील मोरव्हाल हे आदिवासी व सामान्य लोकवस्तीचे गाव असून या गावाला गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत होती. भर उन्हाळ्यात ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले. महिला व मुले दूरवरून पाणी आणत होते. अशी परीस्थिती असतांना स्थानिक ग्रामस्थांनी संबधित लोकप्रतिनिधी व शासनाचे आधिकारी यांना गावाच्या पाणीटंचाईबाबत लेखी व प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले मात्र गावाची कुणीही दाद घेतली नाही. यात अधिकारीवर्गाने भेटी देवूनही समस्या सुटली नाही. या गावाच्या पाणीटंचाईबाबत अनिलभाऊ चौधरी यांना माहिती होताच त्यांनी ग्रामस्थांची भेट घेवून आपण ही समस्या येत्या दोन दिवसात सोडवू, असा शब्द दिला. त्या नुसार शब्दाला जागत गावात ट्युबवेल करण्याचे ठरविले. एका ट्युबवेलची अडचण आल्याने दुसरी कडे ट्युबवेल केली गेली. या ठिकाणी ट्युबवेलला मुबलक पाणी लागले. स्वतः अनिल चौधरी यांनी थांबुन हे काम करवून घेतले हे विशेष.
समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध -अनिल चौधरी
अनिल चौधरी यांनी मोरव्हाल गावाची पाणीटंचाईची समस्या सोडवल्यानंतर सत्कर्म केल्याची भावना व्यक्त केली. आपले कार्य हे नेहमी तळागाळातील सर्वसामान्यांसाठी असून याच पद्धतीने यापुढे परीसरातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देवू, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित युवा नेते धीरज अनिल चौधरी, माजी सरपंच खुदाबक्ष तडवी, मौलाना जुम्मा तडवी, राजू पंजाबी, भुसावळचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर, भुरेखा तडवी, दिलीप बंजारा व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.