आकुर्डी : प्रतिनिधी – आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने आणि माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाशी संपर्क वाढावा आणि जुन्या आठवणींना उजाळा देता यावा यासाठी प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी विद्यार्थी मेळावा मंगळवारी मोठ्या उत्साहात झाला. त्यावेळी अभिनेते विजय कदम प्रमुख पाहुणे होते. मेळाव्यात व्याख्यानांसह मनोरंजनपर विविध कार्यक्रम झाले.
यांची होती उपस्थिती
मेळाव्यास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, माजी नगरसेविका शमीम पठाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, माजी विद्यार्थी नगरसेवक अमित गावडे, पंकज भालेकर, मोरेश्वर शेडगे, विनायक रणसुभे आदी उपस्थित होते.
माजी मेळावा आदर्श उपक्रम
365 दिवस देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणार्या सैनिकांना मानाचा मुजरा करत सिनेअभिनेते विजय कदम यांनी मनोगताला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी ध्येय बाळगणे गरजेचे आहे. ते गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची शिक्षक मशागत करत असतात. प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी विविध श्रेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. हा या महाविद्यालयाचा खरा गुण आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अडचणीतील आजी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निधी संकलित करत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे.’
प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर म्हणाले, महाविद्यालयाने विविध नव-नवे कोर्से सुरु केले आहेत. संशोधनासाठी आणखी प्रयत्न केले जाणार आहेत. महाविद्यालयाने स्कील डेव्हेलपमेंटचे कोर्स सुरु केले असून परीक्षेत एक गुण कमी पडला तरी चालेल. परंतु, विद्यार्थी कुशल झाला पाहिजे, हे महाविद्यालयाचे धोरण आहे. प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले असून आज मोठ-मोठ्या पदावर काम करत आहेत. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेणारे पुणे जिल्ह्यातील हे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयात क्रीडा अॅकडमी सुरु करण्याचा मानस असल्याचेही, त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पागौरी गणपुले आणि नाना शिवले यांनी केले.