मुंबई:- शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचसोबत मोर्चाच्या ठिकाणी आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात देखील पोलीस विभागाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंत्रालय आणि विधिमंडळ याकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. किसान मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चामध्ये मोठया प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर विधीमंडळावर चालून जाणार असल्याची घोषणा मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी काही संशयीत लोकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
सरकारी व्यवस्थेमध्ये आपली कामे होत नसल्याने लोकांची नाराजी मंत्रालयात येऊन पोहोचली आहे. मंत्रालयात आत्महत्या आणि आत्महत्यांचे प्रयत्न झाल्याने राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे. मंत्रालयात येऊन आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांची कसुन तपासणी केली जात आहे. तसेच, मंत्रालयात विविध ठिकाणी जाळ्याही बसविण्यात आल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या घटनांची पुनरावृत्ती विधानभवनात देखील होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. सोमवारी मोर्चाच्या निमित्ताने हजारो नागरिक मुंबईत आले असल्याने विधानभवनात प्रवेश करणाऱ्यांचे ओळखपत्र काटेकोरपणे तपासत असल्याचे दृश्य होते. बाहेर देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून विधानभवन परिसरात पर्यंत जागोजागी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती.