मुंबई :- किसान सभेच्या शेतकरी मोर्चात प्रत्येकजण आपापल्या परीने सहकार्याच्या भावनेने मोर्चात सहभागी लोकांना मदत करत होता. मोर्चामध्ये नाशिकहून सामील झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईल चार्जींगसाठी एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली. सध्या मोबाईल ही आवश्यक बाब झाली आहे. मोर्चातील शेतकरी कायम मोबाईलद्वारे घरच्यांच्या संपर्कात रहावे, यासाठी काही तरुणांनी सोलार पॅलेटद्वारे चार्जिंगची व्यवस्था केली. विशेष म्हणजे हा सोलार पॅलेट डोक्यावर घेऊन या शेतकरी बांधवांनी नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास केला. नथु निवृत्ती उदार यांनी स्वतःच्या डोक्यावर सोलार पॅनलचा बॉक्स घेऊन प्रवास केला. याद्वारे प्रवासात त्यांनी तीनशेच्या वर मोबाईल चार्जिंग केले. मोर्चामध्ये आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता आम्ही सगळे लोक घर सोडून सात दिवसांपासून इकडे आहोत. मात्र आमच्या घरच्या मंडळींशी संपर्क करण्यासाठी आम्हाला मोबाईलच्या चार्जिंगचा प्रश्न समोर येणार होता. त्यामुळे सोलार पॅनलची शक्कल लढविली असल्याचे नथू उदार यांनी सांगितले.
राजकीय पक्षांसोबत कलाकारांचाही पाठिंबा
या मोर्चाचे विविध राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासोबत बॉलिवूड कलाकारांनी देखील पाठिंबा दिला आहे. दहावीच्या परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी पहाटेच पोहोचण्याचा निर्णय मोर्चेकऱ्यांनी घेतला. स्वतः थकलेले असताना, पायाला फोड आलेले असताना हे शेतकरी रात्रभर चालले याबद्दल अभिनेता रितेश देशमुख याने शेतकऱ्यांना सलाम केला आहे. शेतकरी मोर्चाला पाठिंबा देताना रितेश देशमुख याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. त्याने एक पोस्ट लिहून मोर्चेकऱ्यांचे कौतुक करत त्यांना सलाम केला आहे. ”सुमारे ५० हजार शेतकरी त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा, या रास्त मागणीसाठी १८० किमी चालत आले आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी ते शेवटच्या क्षणी रात्रभर चालले.”, असे म्हणत रितेश देशमुख याने शेतकऱ्यांना सलाम केला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी हिने सोशल मीडियावर मोर्चाचा फोटो शेअर केलाय. ती फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हणते, ‘या शांततापूर्ण आंदोलनाला आपलाही पाठिंबा दाखवूया. क्षुल्लक राजकारणाला बाजूला ठेवूया. यावर तोडगा काय आहे, याचा विचार करूयात.’ असे लिहिले आहे.