मोर नदीवरील जीवघेण्या पुलामुळे अपघात वाढले

0
सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेण्याची अपेक्षा
भुसावळ:- भुसावळ-यावल मार्गावरील अंजाळे गावाजवळील मोर नदीचा पूल आता मृत्यूशैय्या बनू पाहत आहे. दोन्ही बाजूंनी असलेल्या वळण रस्त्यावरच असलेल्या पुलाचे कठडे तुटले असून रिफेक्टरदेखील नाहीत. यामुळे या पूलावर मोठा अपघात होण्याची भीती वाढली आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक होत आहे. भुसावळ-यावल मार्गावरील अवजड वाहतूक वाढली आहे. चोपडा, शिरपूरकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक या मार्गावरुन जाते तसेच भुसावळकडून गुजरातमधील अंकलेश्वरकडे जाणार्‍या वाहतुकीसाठीही यावल मार्ग सोयीचा आहे मात्र या मार्गावरील अंजाळे घाटाच्या खालील भागात असलेली मोर नदीचा पूल आता मृत्यूशैय्या ठरु पाहत आहे. गेल्या चार महिन्यात या पूलावरुन दोन ट्रॅक उलटून अपघात झाला. दुर्देवाने प्राणहानी घाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली.
बांधकाम विभागाने दखल घेण्याची अपेक्षा
बांधकाम विभागाने यापूलाचे संरक्षण कठडे उभारणी करणे, पुलाचे रुंदीकरण करुन दोन्ही बाजूंनी वळण रस्त्यावर रिफलेक्टर व वळण रस्त्याबाबत चालकांना माहिती मिळेल, असे स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे अपेक्षीत आहे मात्र वारंवार मागणी करुनही याकडे सोयीस्कर पध्दतीने कानाडोळा केला जात असल्याने अपघातांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.