पिंपरी-चिंचवड : सोशल मीडियाच्या माध्यमातून मोलकरीण पुरविण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करण्यात आली, याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरीण पुरविण्याच्या बहाण्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेस फसविण्याचा एक प्रकार शनिवारी पुणे येथे उघडकीस आला. त्यानंतर अगदी तसाच प्रकार पिंपरी येथे घडला आहे. याबाबत संध्या सुरवंशी (वय 60, रा. पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली. अज्ञात इसमाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञात अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 हजारांचा गंडा
दिलेल्या माहितीनुसार, संध्या सूर्यवंशी यांनी घर कामासाठी दोन महिलांची आवश्यकता होती. त्यांनी जस्ट डायल या सेवेचा उपयोग करत फोन करून याबाबत माहिती मागितली. त्यानंतर एका अज्ञात इसमाने व्हाट्स अपच्या माध्यमातून सूर्यवंशी यांच्या व्हाट्स अपवर मोलकरणीची माहिती व फोटो पाठवून विश्वास संपादित केला. तसेच 11 डिसेंबर, 2017 पासून सूर्यवंशी यांच्याकडून बँक खात्यात 15 हजार रुपये रक्कम भरण्यात सांगितली. सूर्यवंशी यांनी संबंधित बँक खात्यात रक्कम भरली.
पिंपरीत गुन्हा दाखल
दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर देखील त्यांना मोलकरीण पुरविण्यात आली नाही. तसेच पैसे देखील परत करण्यात आले नाहीत. यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे करीत आहेत.