चिंबळी । मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक 550 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 23 हजार 170 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 56 क्विंटलने वाढली; तर पालेभाज्यांची आवक 8 हजार 810 गड्डयांनी वाढली. गेली तीन आठवडे बाजारात फळभाज्यांची आवक मंदावली होती. आता परिस्थिती हळुहळू पुर्वपदावर येत आहे. याशिवाय मंगळवारी असलेल्या कार्तिकी यात्रेनिमित्त बाजारात भुईमूग शेंगा व रताळ्याची आवक वाढली होती.
मिरचीची आवक घटली
मिरचीची आवक एक क्विंटलने घटली असून, भावात 750 रुपयांची वाढ झाली. दुधी भोपळ्याची आवक दोन क्विंटलने घटूनही भाव मात्र स्थिर राहिले. काकडीची आवक तीन क्विंटलने वाढूनही भावात 50 रुपयांची किरकोळ घट झाली. कारल्याची आवक स्थिर राहूनही भावात 250 रुपयांची घट झाली. भूईमुग शेगांची दोन क्विंटल आवक झाली. फ्लॉवरची आवक 22 क्विंटलने घटुन भावात 500 रुपयांची घट झाली. कोबीची आवक आठ क्विंटलने वाढूनही भाव मात्र स्थिर राहिले. वांग्याची आवक 11 क्विंटलने वाढली असून, भाव मात्र स्थिर राहिले. वालवरची आवकसात क्विंटल वाढून, भावात 250 रुपयांची वाढ झाली. तोंडल्यांची दोन क्विंटल, तर शेवग्याची पाच क्विंटल आवक झाली. तर पावट्याची आवक 4 क्विंटलने वाढून भावात 900 रुपयांची घट झाली. ढोबळी मिरचीची आवक 10 क्विंटलने वाढली असून, भाव मात्र स्थिर राहिले. लिंबाची आवक आठ क्विंटलने वाढली असून, भावात 1600 रुपयांनी घट झाली.
कांद्याचे दर चढेच
या आठवड्यात कांद्याची आवक 40 क्विंटलने वाढून, सरासरी भावात 750 रुपयांची वाढ झाली. बटाट्याची 26 क्विंटल आवक होऊन भाव मात्र स्थिर राहिले. रताळ्याची चार क्विंटल आवक झाली. आल्याची आवक 32 क्विंटलने वाढूनही भाव 750 रुपयांनी वधारले. भेंडीची आवक दहा क्विंटलने वाढली असून, भावात 250 रुपयांची घट झाली. गवारीची आवक चार क्विंटलने वाढूनही भाव मात्र स्थिर राहिले. टोमॅटोची आवक 14 क्विंटलने वाढली असून, भाव मात्र स्थिर राहिले. मटारची आवक एक क्विंटलने वाढूनही दर आठ हजार रुपयांवर स्थिरावले. घेवड्याची आवक तीन क्विंटलने वाढली असून, भावात 500 रुपयांची घट झाली. दोडक्याची आवक व भाव स्थिर राहिले.