पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी मोशी येथील जिल्हास्तरीय न्यायालयाच्या इमारतीची नुकतीच पाहणी केली. त्यामुळे या इमारतीच्या उभारणीला गती मिळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. येत्या काही दिवसांपासून थंडावलेल्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने न्यायसंकुल लवकरच उभारण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किरण पवार यांनी सांगितले.
योग्य पाठपुरावा नाही
मोशी येथील जिल्हास्तरीय न्यायालयाची इमारत उभारण्याचे काम शासनाच्या दिरंगाईमुळे रखडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यावर योग्य पाठपुरावा केला जात नसल्याने ही इमारत उभी राहण्यास अडथळे निर्माण होत आहे. स्थानिक आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनीही हा विषय अधिवेशनात उपस्थित केला जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी पिंपरी येथील सध्या सुरू असलेल्या न्यायालयाची तसेच, मोशीतील नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सात मजली इमारत
यावेळी नियोजित इमारतीच्या बांधकामासाठीचा तयार केलेला नकाशा आणि संबंधित कामाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार मोशीतील बोर्हाडेवस्तीमधील 15 एकर जागेवर उभारण्यात येणार्या सात मजली प्रशस्त इमारतीचा आराखडा व नकाशा मंजुर झाल्याचे सांगण्यात आले. पुढील काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किरण पवार, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर-पाटील, अॅड. सुनील कड, अॅड. जिजाबा काळभोर, अॅड. बी. के. कांबळे, अॅड. राकेश अकोले, अॅड. रमेश जाधव, अॅड. रवींद्र रेणके, अॅड. अधिक चरेगांवकर, अॅड. प्रमिला गाडे, अॅड. मुकूंद ओव्हाळ, अॅड. सविता तोडकर उपस्थित होते.