पिंपरी-चिंचवड : मोशी येथील तलावात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागेश गादगे अस मृत्यू झालेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे. पुण्यात कामाला असलेला नागेश पिंपरी-चिंचवड मधील मित्रांना भेटायला आला होता. मात्र मित्रांना भेटण्याची त्याची ती भेट अखेरची ठरली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मित्रांना भेटण्यासाठी बुधवारी सकाळी नागेश मोशी येथे आला होता. येथील समीर आणि दुसऱ्या एका मित्राला भेटायला गेला होता. या मित्रमंडळींमध्ये गावाकडील गप्पा गोष्टी चांगल्या रंगल्या. तेवढ्यात मोशी येथील तलावात पोहायचे ठरले. त्याप्रमाणे मोशी येथील तलावात पोहायला तिघे जण गेले. मात्र नागेशला पोहता येत नसल्याने तो कडेलाच बसून अंघोळ करत होता. तर समीर आणि दुसरा मित्र तलावाच्या मध्यभागी जाऊन पोहण्याचा आनंद घेत होते. त्याच दरम्यान, नागेशचा पाय घसरला आणि तो थेट तलावात बुडायला लागला. त्याने दोन्ही हात वर करत मित्रांकडे मदतीची याचना केली. परंतु, दोन्ही मित्र मध्यभागी असल्याने त्यांना येण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत नागेश पाण्यात बुडाला होता. मित्रांनी नागेशला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो नागेश त्यांना सापडला नाही. दरम्यान पुण्यातून मोशी येथे भेटायला आलेल्या नागेश आणि इतर दोन मित्रांची ही शेवटची भेट ठरल्याने मित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे. नागेश हा मूळचा सोलापूरचा असून तो नेहमी घराबाहेर असायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.