कर्मचार्यांचा निष्काळजीपणा
मोशी : कचरा वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे रविवारी आदर्शनगर मधील रस्त्यांवर हॉटेलचा कचरा पडला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोशी कचरा डेपोलगतच्या रहिवाश्यांनी केली आहे. अधीच कचरा डेपोची दुर्गंधी खूप येत असते. त्यात रस्त्यावर पडलेल्या हॉटेल वेस्टमुळे अजून त्रास सहन करावा लागतो आहे.
20 वर्षांपूर्वी मोशी गावचा महापालिकेत समावेश झाला त्याआधीपासून हे नागरिक तेथे रहात आहेत. या कचरा डेपोमध्ये दररोज शेकडो टन कचरा येत असतो. कचर्यामध्ये जास्त प्रमाण हॉटेलच्या शिळ्या अन्नाचे असते. हा कचरा वाहतूक करणारी वाहने तुडुंब भरलेली असतात. रविवारी अशाच पूर्ण भरलेल्या वाहनातून 4-5 गोण्या रस्त्यावर पडल्या. नागरिकांच्या तक्रारी नंतर गोण्या उचलल्या. मात्र रस्त्यावरील कचरा तसाच राहिला आणि कचर्याची दुर्गंधी पसरली आहे. याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.