मोहम्मद, जेकब, राजीव उपांत्य फेरीत

0

भुवनेश्‍वर। कलिंगा स्टेडियममध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या 22 व्या आशियाई मैदानी स्पर्धेतील पहिल्याच दिवशी भारतीय धावपटूंनी छाप पाडली आहे. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनस, अमोज जेकब आणि राजीव अरोकीआने उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अन्य शर्यतींमध्ये अजयकुमार आणि सिद्धांत अधिकारीने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत आगेकूच केली. 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत मोहम्मद अनसची खराब सुरुवात झाली होती. सुरुवातीला 200 मीटरपर्यंत अनस मागे पडला होता. पण नंतर त्याने जोर लावत श्रीलंकेच्या दिलीप रुवानपाठोपाठ दुसरे स्थान मिळवले. या शर्यतीय अनसने 46.70 सेंकद अशी वेळ नोंदवली. प्राथमिक फेरीत बर्‍यापैकी कामगिरी करणार्‍या अनसची सर्वोत्तम कामगिरी 45.32 सेकंदाची आहे. ही वेळ त्याने मे महिन्यात नोंदवली होती. या कामगिरीमुळे अनसने ऑगस्टमध्ये होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या 45.50 सेकंदाच्या पात्रता वेळेचा निकषही पूर्ण केला होता. दरम्यान राजीवने 46.41 आणि ज्युनीअर गटातील अमोज जेकबने 47.09 सेकंद अशा कामगिरीसह या शर्यतीच्या उपांत्य फेरीतले स्थान निश्‍चित केले आहे. मध्यम पल्ल्याच्या 1500 मीटर अंतराच्या शर्यतीत भारताच्या अजयकुमार आणि सिद्धांत अधिकारीने पदकाच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम राखले.

जगतारने तीन वर्षांमध्ये मारली होती मुसंडी
आशियाई स्पर्धेसाठी पात्रतेचा निकष पूर्ण करताना जगतारने 6888 गुण मिळवले होते. त्याच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेत त्याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात होती.

तीन वर्षाच्या कालावधीत जगतारने वेगाने या खेळात मुसुंडी मारली होती. गत राष्ट्रीय स्पर्धेत तो दुसर्‍या स्थानावर होता. या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील आंतरविद्यापिठ मैदानी स्पर्धेत तो विजयी ठरला होता.

फेडरेशन चषक स्पर्धेतही त्याने चांगली छाप पाडली होती. दुसर्‍या चाचणीतही जगतार दोषी आढळल्यास त्याच्यावर चार वर्षामच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते.

ओदिशाची ऐतिहासीक परंपरा, संस्कृती आणि विकसी अर्थव्यवस्थेची झलक दाखवणार्‍या सांस्कृतीक कार्यक्रमांनी 22 व्या आशियाई मैदानी स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक्स महासंघाचे प्रमुख सॅबेस्टीयन को, आशियाई महासंघाचे प्रमुख दहलान अल हमाद, भारतीय अ‍ॅथलॅटिक्स महासंघाचे प्रमुख अदिल सुमारीवाला, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सचिव इंजेती श्रीनिवासन उपस्थित होते. सहभागी 44 देशांच्या धावपटूंच्या संचालनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय पथकाचे नेतृत्व टिंटू लुकाने केले. तर ओदिशाची आंतरराष्ट्रीय धावपटू सर्बानी नंदाने सहभागी खेळाडूंच्या वतीने शपथ घेतली. शंकर-एहसान लॉय या जोडीने प्रसिद्ध असे संबालपुरी लोकगित रंगाबत्तीचे सादरीकरण केले. त्यानंतर शंकर महादेवन यांच्या गाण्यावर थायलंडच्या थाऊजंड हॅण्ड्स या नृत्यपथकाने धरलेल्या ठेक्याला उपस्थित क्रीडाप्रेमींनीही दाद दिली. तीन मोठ्या फुग्यांखाली अंतराळविरांनी केलेला स्कायवॉक या सांस्कृतीक कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरला.

जगतार सिंग दोषी आढळला
आशियाई मैदानी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डेक्थालॉनपटू जगतारसिंग उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी असल्याचा अहवाल आल्यामुळे भारतीय संघाला धक्का बसला. गतारची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. राष्ट्रीय उत्तेजकद्रव्यविरोधी संस्थेने (नाडा) पुढील अहवाल येईपर्यंत जगतारवर निलंबनाची कारवाई केली आहे. आशियाई स्पर्धेतील डेक्थालॉन प्रकारात भारताची मदार आता अभिेषक शेट्टीवर असेल. जून महिन्यात पटियाला येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेदरम्यान जगतारची चाचणी घेण्यात आली होती.