कोलकाता । भारतीय क्रिकेट संघामधील जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच शमीने आपल्याला मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. शमीने मुलींसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स आणि मुलींचे काही फोटो सोशल मीडिया साईटवर हसीनाने शेअर केले आहेत. हसीन जहाँने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख तिच्या पोस्टमध्ये केला आहे. या आरोपांमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. हसीनाने आपल्याकडे शमीविरोधात अनेक पुरावे असल्याचे म्हटले आहे.
या पुराव्यांच्या आधारावर ती शमीवरील आरोप सिद्ध करू शकते. शमीने मुलींसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रिन शॉट हसीनकडे आहेत. ही चॅटिंग गेल्या दोन दिवसांमधील आहे. या संपूर्ण प्रकरणी बीसीसीआय आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. पण बीसीसआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने याप्रकरणी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ही त्यांची खासगी बाब आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही पडता कामा नये. तसेच सध्यातरी त्याच्याविरुद्ध कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. त्याच्यावर कोणतेही आरोप निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही त्यांची अंतर्गत बाब आहे. पण याप्रकरणी जर पोलीस तक्रार नोंदवण्यात आली. आयपीएलच्या 11 व्या मोसमात शमी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. पण आयपीएलच्या तोंडावरच हे प्रकरण समोर आल्याने शमीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही सध्या तरी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने 3 कोटीमध्ये शमीला खरेदी केले आहे.
शमीचे स्पष्टीकरण
मात्र, या आरोपांचे खंडन करत मोहम्मद शमीने लिहिले की, हे त्याच्या विरूद्ध रचलेले कारस्थान आहे. मात्र, शमीवर झालेले हे गंभीर आरोप खुद्द त्याच्या पत्नीनेच केले आहेत की दुसरे कोणी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही बातमी व्हायलर होताच मोहम्मद शमीच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट डिलीट करण्यात आले.