सात महिन्यांचे वीज बिल नियमित करून देण्यासाठी स्वीकारली होती 13 हजारांची लाच
धुळे- शहरातील मोहाडीतील वीज कंपनीचे सहाय्यक लाईनमन प्रदीप हिंमतराव वाघ (55, एमआयडीसी अवधान, धुळे) यांना 13 हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचून अटक केली होती. सात महिन्यांचे वीजबिल आणि मीटर नियमित करून देण्यासाठी लाइनमनने लाचेची मागणी केल्यानंतर मोहाडीतीच तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे धाव घेतल्यानंतर तक्रारदारांच्या काकांच्या घरी आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली होती. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
बिल मॅनेज करण्यासाठी स्वीकारली लाच
तक्रारदारांच्या काकांनी सात महिन्यांपूर्वी वीज कंपनीकडून मीटर घेतले मात्र वीज बिल न आल्याने सात महिन्यांचे वीज बिल मॅनेज करून देता व नंतर बिल रेग्यूलर करून देण्यासाठी सहाय्यक लाईनमन प्रदीप वाघ यांनी 13 हजार रुपये लाचेची मागणी केली. 2 रोजी दुपारी आरोपीला तक्रारदारांच्या काकांच्या घरी बोलावल्यानंतर एसीबीने सापळा रचून आरोपीला अटक केली. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पवन पी.देसले व सहकार्यांनी केली.