मोहाडीत भिक्षेकर्‍याचा खून उघड : तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : धुळे तालुक्यातील मोहाडी गावाजवळ 60 वर्षीय अनोळखी इसमाचा खून झाल्याची घटना 20 रोजी उघडकीस आली होती. या खुनाचा उलगडा करण्यात मोहाडी पोलिसांना यश आले असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. संजय वसंत पखाले, प्रतीक पखाले उर्फ गुड्डू, आकाश उर्फ गुरू जगन्नाथ बोरसे (सर्व रा.मोहाडी, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, संशयीत संजय पखाले यांचा अनोळखी भिक्षेकर्‍याशी वाद झाला व त्यातून त्यांनी मुलासह अन्य साथीदाराच्या मदतीने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

भिक्षेकर्‍याची हत्या करीत फेकला मृतदेह
मोहाडी गावाकडे जाणार्‍या उड्डाणपुलावर यशवंत कृषी विद्यालयाच्या भिंतीला लागून 55 ते 60 वर्षीय अनोळखीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हा प्रकार 20 रोजी उघडकीस आल्यानंतर चाळीसगाव रोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे खुनाची उकल केली. गुन्हा घडल्यानंतर संजय पखाले हा घरी आला नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक घरी पोहोचताच संशयीताचा मुलगा गुड्डू पसार होवू लागल्याने संशय बळावला व त्याला ताब्यात घेताच त्याने घटनाक्रम सांगितला. आपल्यासह वडील संजय व त्यांचा साथीदार गुरूने ही हत्या वादातून केल्याची संशयीताने कबुली दिली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळ्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकरराव पिंगळे, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, मोहाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील हवालदार श्याम काळे, प्रभाकर ब्राह्मणे, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, धीरज गवते, राहुल गुंजाळ आदींच्या पथकाने केली. तपास सहा.निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.