जळगाव । शहरातील मोहाडी रस्त्याचे रुपडे लवकरच पालटणार आहे. अडिच की.मी. पर्यंत या रस्त्यांचे डिव्हायडरचे सुशोभीकरण व दुतर्फा वृक्ष लावण्याच्या कामास आठवडाभरात सुरुवात करण्यात येणार असल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली. मराठी प्रतिष्ठान लोकसहभागातून हे काम करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
जळगाव शहरातील आदर्शनगराच्या मागील चौकातून मोहाडी रस्ता सरु होतो. रस्ता विस्तृत व शहराच्या बाहेर असल्याने शांतता प्रसन्न वातावरण असते. यामुळे गेल्या काही वर्षापासून या रस्त्यावर मार्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी जळगावकरांची गर्दी असते. ही बाब लक्षात घेवून जळगावातील मराठी प्रतिष्ठानातर्फे या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. हे काम परिसरातील नागरिकांच्या सहभाग घेवून करणार असल्याची माहीती प्रतिष्ठानाचे विजय वाणी व जमिल देशपांडे यांनी दिली. तसेच मराठी प्रतिष्ठानतर्फे डी-मार्टपासून खुबचंद साहित्या टॉवर्पयतच्या सुमारे अडीच किमी रस्त्याच्या दुभाजकात बोगनवेल लावण्यात येणार आहे.
वॉशरुम अन पाणपोईही
या रस्त्यावर पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वॉशरुम देखिल करण्यात येणार आहे. तसेच अद्यावत पाणपोई बांधणार असल्याचे त्यांनी सांगीतले. महापालिका प्रशासनाने परवानगी दिल्याने येत्या आठवड्यात या कामाची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. जळगाव शहरातील न्यायधिश यांच्या निवसस्थानाजवळील मोकळ्या पटांगणात देखिल मराठी प्रतिष्ठानाकडून 100 वृक्ष लावण्यात येणार असल्याचे विजय वाणी यांनी सांगीतले. तसेच गुरूवारी मराठी प्रतिष्ठानतर्फे शिरसोली नाक्यावर गणपतीनगरमधून तांबापुराकडे जाणार्या रस्त्यावर हगणदरी बंद करण्यासाठी वृक्षारोपण करून रस्ता सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचवेळी महापौरांनी लोकसहभागातून एखादे काम हाती घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत डी-मार्ट पासून खुबचंद साहित्या टॉवर्पयत सुमारे अडीच किमीचा रस्ता लोकसहभागातून सुशोभिकरण करून, विकसित करण्याची जबाबदारी मराठी प्रतिष्ठानने घेतली. त्यामुळे आता शहरातील मोहाडी रस्त्याचा कायापालट होणार आहे. तर रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चला बोगनवेल लावू या !
मोहाडी नाका पर्यंत अडिच कीलो मीटरच्या या रस्त्यावर डिव्हायडरमध्ये रंगेबेरंगी फुलांचे 2 हजार बोगनवेल लावण्यात येणार आहेत. हा उपक्रम ‘चला बोगनवेल लावू या’ या नावाने राबविण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडु निंबाची झाडे लावण्यात येतील. रस्त्यावर झेब्रा क्रासिंग, डिव्हाडरची रंगरंगोटी देखिल करण्यात येणार आहे. आठवडाभरात या कामास प्रारंभ होणार आहे.