मध्यरात्रीची घटना ; दोन कुटुंबाचा संसार खाक
जळगाव : मोहाडी रस्त्यावरील म्हशींच्या गोठ्याजवळील झोपड्यांना मध्यरात्री अडीच ते तीन वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन जण भाजले असुन दोन कुटुंबाचा संसार खाक झाला आहे.
मोहाडी रस्त्यावर दौलत नगरच्या समोर म्हशींच्या गोठ्यात मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून अनेक कुटुंब झोपडी करुन वास्तव्य करीत आहेत.बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजता शांताबाई रमेश वर्मा यांच्या झोपडीत आग लागली. हा प्रकार पाहताच शांताबाई यांचा मुलगा संदीप याने जीव धोक्यात घालून पत्नी ममता, मुलगी कांचन, गुनगुन व सहा महिन्याची मुलगी यांना बाहेर काढले तर आई पेटत असताना तिच्या अंगावर धाव घेतली. पाणी टाकून आईला विझविले. यात शांताबाई रमेश वर्मा (७५) ह्या ७० टक्क्याच्यावर भाजल्या आहेत.
शांताबाई यांच्या झोपडीला लागूनच रमेश राजपूत यांची झोपडी आहे, त्यामुळे या आगीत ही झोपडी देखील खाक झाली असून रमेश राजपूत यांना तोंडाला, हाताला व पोटाला आगीची झळ बसली आहे. पत्नी सुलोचना या मात्र सुरक्षित राहिल्या आहेत. घरातील कपडे, गहू, ज्वारी, तेल, साखर, कपडे या आगीत खाक झाले आहे. या दोन्ही कुटुंबाचे संपूर्ण नुकसान झाले असून फक्त कोळसाच शिल्लक राहिला आहे. शेजारी असलेल्या नरगीस जालंदर नेतलेकर यांच्या झोपडीला पत्र्याचा आडोसा असल्याने हे कुटुंब आगीपासून बचावले.