* शेजारी राहणार्या रहिवाश्याच्या आले लक्षात
* एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
* सोन्या, चांदीच्या दागीन्यांसह रोकड 40 हजारांचा ऐवज चोरीला
जळगाव । मोहाडी रोडवरील नेहरू नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून आत प्रवेश करत सोन्या, चांदीच्या दागीण्यांसह रोकड रूपये लंपास केल्याची घटना 27 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल रामराव पांढरे (वय-50) रा. नेहरू नगर, मोहाडी रोड, दत्तमंदीराच्या पाठीमागे हे वाकोद ता.जामनेर येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी काही कार्यक्रमानिमित्त 24 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता घराला कुलूप लावून गेले. 25 जुलै रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत दरवाजा आतून बंद करून घेतला. घरातील लाकडी कपाट तोडून कपाटात ठेवलेले बाळासाठी आलेले सोने असे एकुण 9 ग्रॅम सोने आणि 8 हजार रूपये किंमतीचे चांदीचे भांडे आणि 5 हजार रूपयांची किरकोळ रक्कम 40 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेले.
चोरटे मागच्या दरवाजातून पसार
ज्यावेळी चोरी केली त्यावेळी चोरट्यांनी पुढील दोन्ही दरवाजे आतून बंद केले आणि घराच्या पाठीमागील दरवाजा उघडाच सोडून पळ काढला होता. अमोल पांढरे हे स्विच अॅटोमोबाईलमध्ये सेल्स ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांचे मित्र घराकडून जात असतांना समोरून दरवाजाला कुलूप नसल्याने अमोल पांढरे हे घरात असल्याचे समजून त्यांनी अमोला आवाज दिला. मात्र आवाज देवून बराच वेळ झाल्यानंतर घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आत डोकावून पाहिले तर घरातल्या कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसला आणि घराचा मागील दरवाजादेखील उघडाच असल्याचे निदर्शनास आले.
पोलीसात धाव
घराचा मागील दरवाजादेखील उघडाच असल्याचे निदर्शनास आल्याने मित्राने तात्काळ अमोल पांढरे यांच्याशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. त्यानुसार 27 जुलै रोजी सकाळी 8 वाजता अमोल पांढरे घरी असल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटना घडल्यानंतर अमोल पांढरे यांनी एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसात अमोल पांढरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.