मुंबई । आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व स्पोर्ट्स असोशिएशन फॉर इंडियन स्कूल चिल्ड्रेनतर्फे कबड्डी क्षेत्रातील संघटक गोविंदराव मोहिते, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे आणि माजी ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डीपटू किरण जिकमडे यांचा सन्मान कबड्डीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा भारतीय क्रीडा मंदिरात झालेल्या शालेय मुलांच्या मुंबई सुपर लीग कबड्डी स्पर्धेप्रसंगी खेळाडूंना प्रोत्साहन देणार्या या त्रिमूर्तीला सुवर्णमुद्रा, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
नरेंद्र वाबळे यांचा गौरव
यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल नरेंद्र वाबळे यांचादेखील सुवर्णमुद्रा, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष असलेले गोविंदराव मोहिते यांनी स्वतः कबड्डी खेळून मैदाने गाजविलेली असल्यामुळे मुंबईतील विविध कबड्डी उपक्रमात हिरीरीने भाग घेतात. प्रतिवर्षी कबड्डी स्पर्धा होण्यासाठी तसेच इतरांना स्पर्धा भरविण्यासाठी सहकार्य करतात.
क्रीडा संघटक संजय शेटे हे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी सदस्यापासून प्रमुख कार्यवाह आणि अध्यक्ष पदापर्यंत यशस्वीपणे मार्गक्रमणा करीत आहेत. कबड्डीची मैदाने गाजविणार्या ज्युनियर राष्ट्रीय कबड्डीपटू किरण जिकमडे यांनी विविध कबड्डी संस्थाना सदैव मदतीचा हात दिला आहे. शालेय मुलांना योग्य व शास्त्रोक्त कबड्डीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी ते तळमळीने कार्य करीत आहेत. कबड्डी संघटक गणपत लाड यांना कबड्डी गुण गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.