मौजमजेसाठी सायकल चोरणार्‍यांना अटक

0

निगडी-मौजमजा करण्यासाठी सायकल चोरणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपयांच्या 14 सायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक सचिन उगले यांना माहिती मिळाली की, कुदळवाडी येथे आपना वजन काटा येथे चौधरी सायकल मार्टमध्ये काम करणार्‍या इसमाकडे चोरीच्या सायकल असून तो सायकल विकत आहे. पोलीस पथकाने तेथे छापा मारताच चौधरी सेंटर येथील महंमद फिरोज शहादत शाह (वय 19, रा. कुदळवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून पोलिसांनी 93 हजार रुपयांच्या 10 सायकल जप्त केल्या.

तपासात त्याने या सायकल त्याच्या ओळखीचे दोन अल्पवयीन मुले चोरी करुन त्याच्याकडे विक्रीला देत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबधीत मुलांना ताब्यात घेले असता त्यांनी भोसरी, निगडी, चिखली परिसरातून या सायकली चोरी केल्याचे कबूल केले. महमद हा त्यांच्याकडून सायकल विकत घेत आणि त्या जास्त किंमतीत पुढे विकत असे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपयांच्या 14 सायकल जप्त केल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी रविंद्र राठोड, सचिन उगले, गणेश सावंत, प्रविण पाटील, गणेश मालुसरे यांच्या पथकाने केली.