म्यानमारमधील वांशिक सफाईला चीनचा पाठिंबा!

0

म्यानमारच्या सेनेने रखाईन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईला चीनने पाठिंबा दिला आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक रोहिंग्यांनी पलायन केले आहे, तर संयुक्त राष्ट्रसंघाने ही वांशिक सफाई असल्याची टीका केली आहे. ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार या म्यानमारच्या सरकारी वृत्तपत्रात चीनचे राजदूत होंग लियांग यांचे वक्तव्य प्रकाशित झाले आहे. रखाईनमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत चीनची भूमिका स्पष्ट आहे. हा एक आंतरिक मुद्दा आहे, असे लियांग यांनी या वक्तव्यात म्हटले आहे.

म्यानमारच्या सुरक्षा दलांनी दहशतवादाविरोधात दिलेले प्रत्युत्तर आणि लोकांना साहाय्य करण्याची सरकारची कटिबद्धता यांचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात सुरक्षा चौक्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर म्यानमारच्या सेनेने ही मोहीम हातात घेतली आहे. संयुक्त राष्ट्राच्या हिंसेवरील नागरिक अधिकार संघटनेने हे वांशिक सफाईचे स्पष्ट उदाहरण असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेश आणि सुरक्षा परिषदेने म्यानमारच्या प्रशासनाला हिंसा संपवण्याचे बुधवारी आवाहन केले होते.