म्हणून कंगना लग्न करणार नाही

0

मुंबई: बॉलीवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण येत्या काळात कंगना राजकारणात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चांनी जोर धरला आहे. देशाच्या राजकारणाकडे पाहण्याची कंगनाची एकंदर दृष्टी आणि तिचे विचार पाहता तिच्या राजकीय प्रवेशाबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या.

मात्र या सगळ्या चर्चांवर कंगनाने एक स्पष्ट उत्तर दिले आहे. सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याच्या विचारात नसल्याचं कंगना म्हणाली. “मी सध्या ‘मणिकर्णिका’, ‘मेंटल है क्या’ या चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. त्याशिवाय ‘पंगा’ या चित्रपटाचीही आम्ही नुकतीच घोषणा केली आहे. असं असलं तरीही जेव्हा केव्हा मी राजकारणाची वाट निवडेन तेव्हा मी त्यात स्वत:ला झोकून देईन. त्या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करेन”, असं ती म्हणाली.

देशसेवेचा विडा उचलल्यानंतर मग लग्न, कुटुंब आणि दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं याला तितकं प्राधान्य देण्यात येणार नाही. कारण राजकीय नेता हा शासनाचा, देशाचा सेवक असतो याच विचारांवर कंगना ठाम आहे. मुख्य म्हणजे राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपण अविवाहित राहू, याकडेही तिने सर्वांचं नकळत लक्ष वेधलं. त्यामुळे आता तिचे हे एकंदर विचार पाहता आता येत्या काळात ती चित्रपटांच्या दुनियेतून राजकारणासाठी पूर्ण वेळ देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.