मुंबई। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला गेले नाहीत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या तर्कांना ऊत आला होता. उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करण्याच्या मूडमध्ये नाही, असाच काहीसा रंग या तर्कांना होता. गुरुवारी रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांचा विवाह सोहळा औरंगाबादमध्ये पार पडला.
या शाही लग्न सोहळ्याला राज्यातील जवळपास सर्वच बडे नेते उपस्थित होते. खरंतर उद्धव ठाकरे गुरुवारी कोल्हापूरमध्ये शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित होते. त्यामुळेही त्यांना रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाता आले नाही, असेही म्हटले जात होते. दोन्ही लग्नांचा मुहूर्त संध्याकाळचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे औरंगाबादला न जाता कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला गेले, असे कारण चर्चेत दिले जात होते. दरम्यान, रावसाहेब दानवेंनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजेच 22 फेब्रुवारीला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली होती. त्यावेळेसही दानवे आणि ठाकरे यांची भेट युतीच्या चर्चेसाठीच झाली असल्याचा तर्क लढवला गेला होता. मात्र, पुढे त्या तर्काचे कोणतेच पडसाद उमटले नाही. त्यामुळेच आता दानवेंच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरे यांनी न जाणे, हेदेखील सेना-भाजपच्या युतीशी जोडले जात आहे. याचे कारण असे की, युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेच संकेत देण्याच्या मूडमध्ये शिवसेना नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.